• भूषण बोरसे यांना पोलीस दल आणि नागरिकांकडून सन्मानपूर्वक निरोप
  • गुन्हेगारी नियंत्रणासह शांततामय गणेशोत्सवावर निकम यांचा भर

बेळगाव : बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे प्रकाश निकम यांनी स्वीकारली असून, मावळते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना पोलीस दल आणि नागरिकांच्या वतीने सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे, कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करणे आणि आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडणे याला प्राधान्य दिले जाईल, असे नूतन आयुक्त प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त कार्यालयात प्रकाश निकम यांचे आगमन होताच पोलिसांच्या तुकडीकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मावळते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अधिकृतपणे आयुक्तपदाची सूत्रे प्रकाश निकम यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नूतन आयुक्तांचे स्वागत केले.

बेळगाव शहरात माजी आयुक्त भूषण बोरसे यांनी राबविलेल्या चांगल्या उपक्रमांची मालिका पुढेही सुरू ठेवली जाईल, असे निकम यांनी सांगितले. शहरातील गुन्हेगारी पूर्णपणे मोडून काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बेळगावचे पोलीस आयुक्त म्हणून सुमारे १५ महिने सेवा बजावल्यानंतर हुबळी-धारवाड येथे बदली झालेले भूषण बोरसे यांना पोलीस दल आणि नागरिकांच्या वतीने अनोख्या पद्धतीने निरोप देण्यात आला. खुल्या वाहनातून मिरवणूक काढून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारी नियंत्रणासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या.

निरोप समारंभात पोलीस दलाच्या वतीने भूषण बोरसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. पोलीस उपआयुक्त नारायण बरमणी यांनी बोरसे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलल्याचे सांगितले. पोलीस उपआयुक्त निरंजन राज अरस यांनी बोरसे हे एकही सुट्टी न घेता अविरत काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे गौरवोद्गार काढले.

अंमली पदार्थविरोधी मोहीम, वाहतूक नियंत्रण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी राबविलेल्या विविध मोहिमांना नागरिक आणि पोलीस पथकाचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे भूषण बोरसे यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात सहकार्य केलेल्या लोकप्रतिनिधी, नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

निरोप समारंभाच्या अखेरीस पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पुष्पवृष्टी करत भूषण बोरसे यांना सन्मानाने निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.