• भूषण बोरसे यांच्याकडून होणार पदभार हस्तांतरण
  • गणेशोत्सवामुळे लांबलेली प्रक्रिया अखेर पूर्ण

बेळगाव : बेळगाव शहराच्या नूतन पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश अमृत निकम आज, गुरुवारी, अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. मावळते पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे हे त्यांच्याकडे पदभार सोपवणार आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तपदातील बदलानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे.

राज्य सरकारने २९ ऑगस्ट रोजी १५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये भूषण बोरसे यांची बेळगावहून हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी प्रकाश निकम यांची बेळगाव शहर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

शासकीय आदेश जारी झाल्यानंतर निकम तातडीने पदभार स्वीकारतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आणि बदली झाल्यानंतरही बोरसे बेळगावमध्येच कार्यरत राहिले.

  • विसर्जन मिरवणुकीनंतर पदभार देण्याची मागणी

गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडल्यानंतरच बोरसे यांना बेळगावमधून कार्यमुक्त करून निकम यांच्याकडे पदभार सोपवावा, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. याबाबत पालकमंत्री तसेच संबंधित प्रशासनाकडेही निवेदने देण्यात आली होती. आता गुरुवारी सकाळी प्रकाश निकम अधिकृतपणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने पदभार हस्तांतरणाबाबतचा संभ्रम दूर होणार आहे.

  • बेळगावशी निकम यांचे जुने नाते

प्रकाश निकम हे २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सेवाकाळाच्या सुरुवातीला त्यांनी बेळगाव ग्रामीण विभागात प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे बेळगावचा भौगोलिक परिसर तसेच येथील सामाजिक परिस्थितीची त्यांना पूर्वीपासूनच माहिती आहे.

या पूर्वानुभवाचा उपयोग शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे हाताळताना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.