बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या महापौर प्रिती कामकर आणि मनपा आयुक्त कार्तिक एम यांनी आज गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांवर फिरुन विविध कामांच्या तयारीचा आढावा घेतला.

महापौर, शहर कर्मचारी आणि आयुक्तांनी कपिलेश्वर तलाव परिसरात पूजा केली.नंतर, महापौर प्रीती कामकर यांनी राणी चन्नमा चौक,समादेवी, मारुती, गणपती, रामलिंग खिंड गल्ली, संभाजी चौक, टिळक चौक, हेमू कलाजी चौक, मार्केट आणि इतर मार्गांसारख्या गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी केली.

यावेळी बोलताना महापौर प्रिती कामकर म्हणाल्या, रस्त्यावरील खड्डे, स्वच्छता, वीज वाहिन्या इत्यादींची व्यवस्था करण्यासाठी एल अँड टी,हेस्कॉमसह सर्व विभागांना २४ तास काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि त्याप्रमाणे काम जोरात सुरू आहे.

आयुक्त कार्तिक एम. म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्वतयारी बैठकीत ठरल्याप्रमाणे, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी महापालिका आणि विविध विभागांना सर्व कामे वेळेत करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रेयस नाकाडी, राजू भातकांडे, नितीन जाधव, गिरीश धोंगडी, आनंद चौहान, रेश्मा कामकर, वैशाली भातकांडे यांसह अन्य नगरसेवक, विकास विभागाच्या उपआयुक्त लक्ष्मी सुळगेकर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.