- ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त केले होते आयोजन
- शेकडो नागरिक, वैद्यकीय व्यावसायिक व विद्यार्थ्यांचा सहभाग
बेळगाव : कॉर्नियल ब्लाइंडनेस अर्थात बुबुळ अंधत्वाबाबत जनजागृती करण्यासोबतच नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त बेळगावात वॉकॅथॉनचे आयोजन करण्यात आले. नेत्रदानाचे महत्त्व सांगणारे फलक हातात घेत शेकडो नागरिकांनी या जनजागृती उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, जिल्हा अंधत्व नियंत्रण विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, लायन्स इंटरनॅशनल, रोटरी क्लब, बेळगाव आय केअर असोसिएशन, एम. एम. जोशी कोडकणी नेत्र केंद्र आणि एसजीएम आय बँक (एम. एम. जोशी नेत्र संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने या वॉकॅथॉनचे आयोजन करण्यात आले.
राणी चन्नम्मा सर्कल येथून सकाळी वॉकॅथॉनला सुरुवात झाली. अयोध्या शहरातील एम. एम. जोशी कोडकणी नेत्र केंद्र येथे तिचा समारोप झाला. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, स्वयंसेवक, नागरिक तसेच विविध सार्वजनिक संस्थांच्या सदस्यांनी यात सहभाग घेत नेत्रदानाबाबत जनजागृती केली.
डीएलओ तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. गीता कांबळे यांनी अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घेऊन अंधत्व निर्मूलनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
एम. एम. जोशी कोडकणी नेत्र केंद्राच्या वैद्यकीय संचालक डॉ. शिल्पा कोडकणी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकॅथॉनला सुरुवात करण्यात आली. नेत्रदान हे अत्यंत मोलाचे असून प्रत्येकाने नेत्रदानाची प्रतिज्ञा करण्याची गरज आहे. दोन डोळ्यांच्या दानामुळे चार व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. नेत्रदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी नेत्रदान पंधरवडा आयोजित केला जातो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अल इकरा फाउंडेशन, श्री गुरू इन्स्टिट्यूशन्स, लेकव्ह्यू नर्सिंग कॉलेज, ए. एम. शेख होमिओपॅथी कॉलेज, एक्सपर्ट पीयू कॉलेज, मराठा मंडळ डिग्री कॉलेज आणि महावीर मिर्झियो डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वॉकॅथॉनमध्ये सहभागी होत नेत्रदानाचा संदेश दिला.








