- गोमटेश विद्यापीठ कॉलेजमधील घटना
- जखमी विद्यार्थ्यावर बीआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू
बेळगाव : शहरातील गोमटेश विद्यापीठ कॉलेजमध्ये वर्गात बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. वर्गातील वादानंतर एका १७ वर्षीय विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गमित्राने चाकूने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या खांद्याला दुखापत झाली असून त्याच्यावर बीआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वर्गात बसण्याच्या जागेवरून शाब्दिक बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर एका विद्यार्थ्याने चाकूने वर्गमित्राच्या खांद्यावर वार केल्याचा आरोप आहे.
हल्ल्यानंतर जखमी विद्यार्थ्याला तातडीने बीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, संबंधित विद्यार्थी चाकू घेऊन महाविद्यालयात का आला होता, याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे. एसीपी आणि सीपीआय यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. ही घटना टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







