- गोडसे शैक्षणिक निधीतर्फे ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या पुढील वाटचालीला आर्थिक आणि नैतिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने श्री. खेमाजीराव तुकाराम गोडसे शैक्षणिक निधी (ट्रस्ट) यांच्या वतीने शैक्षणिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, सह्याद्री मल्टीस्टेट पतसंस्था, महिला विद्यालयाजवळ, बेळगाव येथे हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास बी. के. मॉडेल हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक के. एल. मजुकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ३७ गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी के. एल. मजुकर, डॉ. अजय काळे आणि डॉ. सुचिता भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केवळ अभ्यासात प्रगती करण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी जीवनातील विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले. सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन या गुणांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असा संदेशही त्यांनी दिला.
कार्यक्रमास मुख्य ट्रस्टी संग्राम चंद्रकांत गोडसे, उपमुख्य ट्रस्टी शशिकला पाटील, विनोद सदाशिवराव भोसले, शिवाजीराव निळकंठराव हांडे, डॉ. स्मिता काळे, स्मिता घाटगे तसेच फलटणहून आलेले किशोर शिवाजीराव गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ ट्रस्टी अप्पासाहेब गंधाडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.
प्रभाकर पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि शैक्षणिक मदतीचा हात देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.







