- पहाटे दोन वाहनांतून आलेल्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी
- छाप्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट
बेंगळुरू : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बेंगळुरूतील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे छापा टाकला. दोन वाहनांतून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती आहे.
उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर जारकीहोळी यांच्या निवासस्थानीही ही कारवाई करण्यात आली. मात्र, या छाप्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या कारवाईबाबत मंत्री सतीश जारकीहोळी किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, बेंगळुरू, बेळगाव, गोवा, गोकाक, महाराष्ट्र यासह एकूण १८ ठिकाणी सतीश जारकीहोळी यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीकडून छापे टाकण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीने उत्पादन शुल्क आयुक्त तसेच मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाणारे वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानीही छापा टाकला होता. बेकायदेशीर अबकारी प्रकरणाच्या अनुषंगाने मंजुनाथ यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विनापरवाना बार परवाना दिल्याच्या आरोपांसह अवैध विदेशी गुंतवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
त्या कारवाईदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर जारकीहोळी यांच्या निवासस्थानी स्वतंत्रपणे तपासणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, छाप्याचे नेमके कारण आणि तपासाची दिशा अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.








