- लेसर लाईटवर पूर्णपणे बंदी
- पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांचा इशारा
बेळगाव : गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. ध्वनिक्षेपक व साउंड सिस्टिमचा वापर, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच गणेशोत्सव काळात लेसर लाईटवर पूर्णपणे बंदी असेल, असा इशारा पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिला.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे सोमवारी (ता. ७) कुमार गंधर्व रंगमंदिर येथे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी तसेच शहरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मंडळाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. ध्वनिक्षेपक व साउंड सिस्टिमचा वापर, मिरवणुकीचे आयोजन, वाहतूक व्यवस्था आणि अन्य बाबतीत निर्धारित नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले.
उत्सवादरम्यान मंडळांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी किंवा पोलिस प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. मंडळांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही केली जाईल. मात्र, उत्सवाच्या नावाखाली कोणताही गैरप्रकार अथवा नियमभंग सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी गणेशोत्सव जवळ आला असतानाही मंडळांची तयारी अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे बैठकीत सांगितले. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल होणार नाहीत, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मंडळांनी विधायक उपक्रमांना प्राधान्य देत रक्तदान शिबिरे आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन केले.
दरम्यान, अधिक आवाजातील साउंड सिस्टिम आणि फटाक्यांमुळे कान व डोळ्यांना होणाऱ्या संभाव्य इजांबाबत जिल्हा रुग्णालयातील डॉ. श्रुती व्ही. एस. आणि डॉ. ज्योतिकुमार पत्तार यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सव मंडळांनीही याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीला पोलिस उपायुक्त नारायण बरमणी, महापालिका आयुक्त कार्तिक एम., रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी, सागर पाटील, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक रवी साळुंके, रमेश सोनटक्की , गणेश दड्डीकर आदी उपस्थित होते.








