• चिक्कोडी उपविभागात पुराचा धोका
  • मुसळधार पावसाचा परिणाम : नऊ पूल पाण्याखाली
  • वाहतूक विस्कळीत

चिक्कोडी : महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीत तब्बल १ लाख ३३ हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून, नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने सीमाभागातील अनेक भाग धोक्याच्या छायेत आले आहेत.

महाराष्ट्रातील कोयना जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तेथून सुमारे ३३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुराच्या पाण्यामुळे चिक्कोडी उपविभागातील नऊ प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. उगार–कुडची पूल पूर्णपणे जलमय झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिक आणि वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.