- बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
- कार व्यवहारातील पैशांच्या वादातून घडला खून
बेळगाव : कार खरेदी-विक्रीच्या पैशांच्या व्यवहारातून बेळगाव तालुक्यातील हुंचेनहट्टी गावाजवळ एका २२ वर्षीय तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडाचा छडा लावत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत पाच संशयित आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.
मजगाव येथील राहुल तळवार (वय २२) असे हा या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, जुनी कार खरेदी करून परत करण्याच्या व्यवहारावरून काही जणांशी त्याचा वाद सुरू होता. याच वादातून सात ते आठ जणांच्या टोळीने राहुलला पैसे देण्याच्या बहाण्याने बुधवारी २७ मे रोजी हुंचेनहट्टी गावाबाहेरील निर्जन ठिकाणी बोलावले. तिथे आरोपींनी तलवारीसह इतर धारदार शस्त्रांनी राहुलवर जीवघेणा हल्ला चढवला. डोक्यावर आणि हातांवर गंभीर जखमा झालेल्या राहुलला तातडीने बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे अवघ्या २४ तासांत पाच आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मृत राहुलच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “माझा मुलगा कोणत्याही भांडणात नव्हता, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या,” असा आक्रोश राहुलच्या आईने केला.
शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, जुन्या कारच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या पैशांच्या वादातून ही हत्या घडली असून, प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.








