• कागवाड दोघांना पोलिसांकडून अटक
  • क्षुल्लक वादातून घडली घटना

कागवाड : तालुक्यातील ऐनापूर येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी कागवाड पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

याबाबत ऐनापूर येथील ललिता सिद्धप्पा कमते यांनी कागवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मंगळवारी दुपारी दीड ते सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान गोविंद शंकर देवल यांच्या शेताच्या बांधावर ही घटना घडली होती. शेतातील नारळ विक्रीच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी संतोष सिद्धप्पा कमते यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि अथणीचे डीएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. अथणी वर्तुळाचे सीपीआय संतोष हल्लार आणि कागवाडचे पीएसआय राघवेंद्र खोत यांच्या पथकाने संशयितांचा माग काढत ऐनापूर येथील बाहुबली बाळासाहेब भोसगे आणि श्रीशैल कल्लाप्पा मडीवाळर या दोघांना अटक केली. या प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.