बेळगाव : बेळगाव शहरासह तालुक्यातील ५५ गावांसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचा महत्त्वपूर्ण ठेका बेंगळुरूस्थित ‘एक्स इम्पासे’ ग्रुप्स या कंपनीला देण्यात आला आहे. बुडा प्रशासनाकडून बुधवारी या कंपनीला स्वीकृती पत्र देण्यात आले असून, सुरक्षा अनामत रक्कम जमा झाल्यानंतर अंतिम कार्य आदेश जारी केला जाणार आहे.

कार्य आदेश मिळाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षण, माहिती संकलन आणि आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. तब्बल पाच वर्षांच्या विलंबानंतर हा मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया गतीमान होत आहे.

शहराचा विद्यमान विकास आराखडा जुना झाल्याने बेळगावच्या विस्तारासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी नवीन मास्टर प्लॅन अत्यावश्यक मानला जात होता. त्यानुसार बुडा प्रशासनाने शहरासह तालुक्यातील ५५ गावांचा समावेश असलेल्या सुमारे ३८९.४१ चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी नवीन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

हा मास्टर प्लॅन अंतिम झाल्यानंतर पुढील २० ते २५ वर्षांच्या कालावधीत बेळगाव शहराच्या विकासाची दिशा निश्चित होणार आहे.