• काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी

बेळगाव : ऐन पेरणी हंगामात बी-बियाणे आणि खतांचा तुटवडा निर्माण होत असल्याचा आरोप करत तसेच युरिया खताचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा दावा करत शेतकरी नेते प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने एडीसी बेळगाव यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध होत नसून काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून बियाणे व खतांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच कृषी सहायक संचालक (AD) आणि कृषी उपसंचालक (DD) यांनी नियमित तपासणी मोहीम राबवून खत व बियाण्यांचा काळाबाजार रोखावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.

यावर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात येत असून बियाणे व खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

या वेळी शेतकरी नेते प्रसाद पाटील यांच्यासह माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, माजी तालुका पंचायत सदस्य मारुती लोकूर, राजेंद्र पाटील, सुरेश जाधव, किरण लोंढे आणि इतर २५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.