• पिस्तूल-चाकूचा धाक दाखवत सुवर्णकारांना लुटले
  • तीस लाखांचे सोने लंपास ; आठ आरोपी अटकेत

बेळगाव : बेळगाव-चोर्ला मार्गावरील बैलूर क्रॉस परिसरात चित्रपटालाही लाजवेल असा थरारक दरोडा घडल्याने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत पश्चिम बंगालमधील तीन सुवर्णकारांना लुटून तब्बल 30 लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली. या प्रकरणी खानापूर पोलिसांनी वेगाने तपास करत आठ आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. के. इबादुल (34) हे आपल्या सहकाऱ्यांसह रबियुल गाजी आणि अली हुसेन मंडल यांच्यासोबत 20 मे रोजी कारने गोव्याकडे जात होते. सायंकाळी सुमारे 6.45 वाजण्याच्या सुमारास बैलूर क्रॉसजवळ दोन संशयित वाहनांनी त्यांच्या कारला अडविले. त्यानंतर सात ते आठ जणांच्या टोळीने तिघांना जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवून जंगल परिसरात नेले.

आरोपींनी तिघांना मारहाण करत पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला त्यांच्याकडील 1 लाख 200 रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतल्यानंतर संबंधित तिघे सुवर्णकार असल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानंतर आरोपींनी अधिक सोन्याची मागणी करत रबियुल गाजी याला बेळगावातील शहापूर परिसरातील कार्यशाळेत नेले. तेथून 205 ग्रॅम सोन्याचे बिस्किट आणि 20 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणण्यास त्याला भाग पाडण्यात आले.

या संपूर्ण घटनेत आरोपींनी एकूण 225 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि हालचालींच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत आठ आरोपींना अटक केली.

या प्रकरणी पीएसआय ए. ओ. निरंजनस्वामी यांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या धाडसी दरोड्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खानापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.