- ७६५ अग्निवीरांनी प्रशिक्षण पूर्ण करून घेतली देशसेवेची शपथ
बेळगाव : अग्निपथ योजनेअंतर्गत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे प्रशिक्षण घेतलेल्या सातव्या अग्निवीर तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि लष्करी शिस्तीच्या वातावरणात पार पडला. २४ आठवड्यांचे कठोर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ७६५ प्रशिक्षणार्थींनी यावेळी देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली.
या भव्य संचलनाचे नेतृत्व अग्निवीर संकेत सिंग यांनी केले, तर मेजर गजानन पाटील यांनी परेडच्या प्रशासकीय अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमात एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी मानवंदना स्वीकारून संचलनाची पाहणी केली. सोहळ्यास वरिष्ठ लष्करी अधिकारी, अग्निवीरांचे पालक, माजी सैनिक, एनसीसी कॅडेट्स तसेच विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी मराठा लाईट इन्फंट्री ही भारतीय लष्करातील सर्वात जुन्या आणि गौरवशाली पायदळ रेजिमेंटपैकी एक असल्याचे सांगितले. येथे दिले जाणारे प्रशिक्षण सैनिकांमध्ये शिस्त, शारीरिक क्षमता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. प्रशिक्षणादरम्यान अंगीकारलेली शिस्त आणि मूल्ये सेवाकाळातही कायम राखावीत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अग्निवीरांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट अग्निवीर नेता म्हणून यशवंत घाडगे यांना सन्मानित करण्यात आले, तर व्हिक्टोरिया क्रॉस पदक घोलप आदर्श यांना प्रदान करण्यात आले.
दीक्षांत संचलनानंतर ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी उपस्थितांनीही शहीद सैनिकांच्या स्मृतींना अभिवादन केले.








