- डी. के. शिवकुमार पदभार कधी स्वीकारणार ?
बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठे राजकीय बदल घडले असून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळालाही तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आले असून, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत सिद्धरामय्या हे प्रभारी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेतृत्वबदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांना या घडामोडीमुळे वेग आला आहे. काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्यपाल थावरचंद गेहलोत त्या वेळी बंगळूरमध्ये उपस्थित नसल्याने राजीनामा राजभवनातील अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आता सर्वांचे लक्ष नव्या मुख्यमंत्रीपदाकडे लागले असून डी. के. शिवकुमार हे कधी पदभार स्वीकारणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.








