• दरोडेखोरांकडून प्रवाशांना मारहाण करत लूट
  • महिलांचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास

सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर- बिकानेर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी पहाटे पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकत महिलांसह प्रवाशांना मारहाण केली. प्रवाशांकडील रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार झाले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गाडी क्रमांक १६५८७ यशवंतपूर–बिकानेर एक्स्प्रेस पहाटे २.४९ ते ४.०३ या कालावधीत तब्बल ७४ मिनिटे तडवळ रेल्वे स्थानकावर उभी होती. याच संधीचा फायदा घेत पाच ते सहा जणांच्या टोळीने एस-४, एस-६ आणि एस-७ या डब्यांमध्ये प्रवेश केला. काही दरोडेखोरांनी खिडक्यांमधून हात घालून प्रवाशांचे साहित्य हिसकावले, तर काहींनी थेट डब्यात घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.

दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या काही प्रवाशांना मारहाण करण्यात आली. तसेच दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची माहितीही समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि प्रवाशांनी आरडाओरडा करून मदतीची याचना केली.

रेल्वेच्या मदत क्रमांकावर माहिती मिळाल्यानंतर गाडी पहाटे ४.५८ वाजता सोलापूर स्थानकात पोहोचताच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) घटनास्थळी दाखल झाले. महेश गोपाळ पवार यांच्या फिर्यादीवरून सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक तांबोळी यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळाची पाहणी केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.