- जलाशय पूर्ण भरण्यासाठी अद्यापही १६ फूट पाण्याची गरज
बेळगाव : जुलैच्या पहिल्या तारखेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राकसकोप जलाशयातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत पाणीपातळी १३ फुटांनी वाढली आहे. गुरुवारी (दि.९) जलाशयात पातळी २,४५८.८० फूट पाणी होते. गतवर्षी याच दिवशी पाणीपातळी २,४७४ फूट होती. जलाशय तुडुंब होण्यासाठी आणखी १६ फूट पाण्याची गरज आहे.
जलाशय परिसरात आतापर्यंत एकूण ९३८.५ मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारी पहाटे संपलेल्या चोवीस तासांत ९२.५ मिमी पावसाची नोंद झाली. सतत दहा दिवस झालेल्या पावसामुळे जलाशय परिसरातील नाले प्रवाहीत झाल्याने मृत साठ्यांपेक्षा कमी पातळी गाठलेल्या राकसकोप जलाशयात १३ फूट पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे, पाणीपातळी २,४५९ फुटांपर्यंत पोचली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत जलाशयात ११ फूट कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यात जलाशय तीनवेळा तुडुंब झाले होते. यंदा हे जलाशय भरण्यासाठी १६ फूट पाण्याची आवश्यक्ता आहे. त्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यक्ता आहे. मात्र, गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलाशय भरण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.








