• ११ ऑगस्टला होणार भव्य जत्रा ; वडगावात भक्तिमय वातावरण

बेळगाव : वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या प्राथमिक धार्मिक विधींना शुक्रवारी सायंकाळी पारंपरिक ‘वरा’ अर्पण करण्याच्या विधीने प्रारंभ झाला. या धार्मिक सोहळ्यामुळे वडगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून जत्रोत्सवाची औपचारिक सुरुवात झाली आहे.

बेळगावसह सीमाभाग, महाराष्ट्र आणि गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवीच्या जत्रोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. ‘वरा’ सोडण्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर पुढील एक महिन्याचा पवित्र कालावधी सुरू होतो. या काळात देवीला नारळ न फोडणे आणि ओटी न भरणे, ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा भाविकांकडून श्रद्धेने पाळली जाते.

जत्रोत्सवापूर्वी येणाऱ्या एकूण नऊ मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी श्री मंगाई देवी मंदिरात विशेष पूजा, आरती आणि विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. या काळात मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणार आहेत.

यंदाचा श्री मंगाई देवीचा भव्य वार्षिक जत्रोत्सव ११ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे. त्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२ या शुभ मुहूर्तावर ‘गाऱ्हाणे आलिशिव’ हा प्रमुख धार्मिक विधी भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होईल. या विधीनंतर जत्रोत्सवाला अधिकृत प्रारंभ होणार आहे.

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती, वडगाव ग्रामस्थ आणि स्वयंसेवक भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन मिळावे यासाठी विविध नियोजन आणि आवश्यक तयारी करण्यात व्यस्त आहेत.