• येळ्ळूर रोडवरील सर्व अधिकृत थांब्यांवर थांबणार बस
  • शेतकरी महिलांच्या संतापाची प्रशासनाने घेतली दखल
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

बेळगाव : येळ्ळूर मार्गावरील अधिकृत बसथांब्यांवर कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसेस न थांबविल्याने संतप्त झालेल्या शेतकरी महिला आणि ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला अखेर यश आले आहे. परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी येळ्ळूर मार्गावरील बसथांब्यांची प्रत्यक्ष पाहणी करून उद्यापासून सर्व अधिकृत थांब्यांवर बस थांबविण्याचे लेखी आश्वासन दिले.

वडगाव, शहापूर, अनगोळ, देसूर आणि राजहंसगड परिसरातील शेकडो महिला दररोज खरीप हंगामातील शेतीकामासाठी येळ्ळूर शिवारात ये-जा करतात. मात्र, सायंकाळी परतीच्या वेळी बसमध्ये जागा उपलब्ध असूनही चालकांकडून अधिकृत थांब्यांवर बस न थांबविल्याने महिलांना तासन्‌तास रस्त्यावर उभे राहावे लागत होते. अनेकदा रात्री सात वाजेपर्यंत त्यांची प्रतीक्षा सुरू राहत असल्याने तीव्र नाराजी पसरली होती. गेल्या वर्षी याच मार्गावर बस न थांबल्यामुळे धावत बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला होता. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांचा संताप वाढत गेला. या प्रश्नावर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ आणि शेतकरी महिलांसह परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी आणले. मार्गावरील सर्व अधिकृत बसथांबे प्रत्यक्ष दाखवून, यापुढेही बसेस न थांबल्यास रस्ता रोको व चाकाजाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनाचा इशारा आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तत्काळ निर्णय घेत सर्व अधिकृत थांब्यांवर बस थांबविण्याचे चालकांना सक्त आदेश देण्यात येतील, असे स्पष्ट केले. यावेळी सतीश पाटील म्हणाले, “शेतकरी महिलांची रोजची होणारी फरफट असह्य झाली होती. न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक निर्णय घेतला. हा शेतकरी महिलांच्या एकजुटीचा विजय आहे.” परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे येळ्ळूर मार्गावरील शेकडो शेतकरी महिलांचा वेळेवर, सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास होणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.