- मुंबईतील उच्चाधिकार समिती बैठकीनंतर कर्नाटकची प्रतिउत्तरात्मक हालचाल
- सीमाभागात संतापाची लाट
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यात असताना कर्नाटक प्रशासनाने न्यायालयीन लढ्याच्या दृष्टीने महत्त्वाची रणनीतिक चाल उचलली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकारकडे सादर केलेल्या धोरणात्मक अहवालात, “बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग असून त्यावर कोणताही वाद ग्राह्य धरता येणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सीमाभागातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या अहवालात ऐतिहासिक नोंदी, प्रशासकीय घडामोडी, घटनात्मक तरतुदी आणि कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे कर्नाटकची बाजू अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्राच्या दाव्यांना न्यायालयात प्रभावी प्रत्युत्तर देता यावे, यासाठी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि विविध कायदेशीर मुद्द्यांचाही या अहवालात समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घडामोडीमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने या अहवालाचा तीव्र निषेध नोंदवत, “सीमालढा अधिक तीव्र केला जाईल. महाराष्ट्राच्या न्याय्य हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष सुरू राहील,” असा इशारा दिला आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबईतील विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील लढा अधिक सक्षम करण्यासाठी नव्या कायदेशीर रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेऊन सीमाप्रश्नी महाराष्ट्राची भूमिका केंद्र सरकारसमोर ठामपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकीकडे कर्नाटक सरकार न्यायालयीन लढ्यासाठी आपली तयारी अधिक मजबूत करत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेही सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत न्यायालयीन, राजकीय आणि लोकशाही पातळीवर संघर्ष अधिक प्रभावी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.








