बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, कडोलीसह नदीकाठच्या गावांतील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात, ऊस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीतील पाण्याची आवक वाढली आहे. मार्कंडेय नदीला आलेल्या पुराचा फटका कडोली, कंग्राळी खुर्द, आंबेवाडी, अलतगा, बेळगुंदी आणि हिंदलगा परिसराला बसला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने उभी पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी चिंतेत आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करण्यात आली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एसडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांनी नदीकाठावर जाणे, पुराच्या पाण्यात उतरणे किंवा सेल्फी काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







