रायबाग : शेतीच्या कामासाठी कृष्णा नदीकाठी गेलेल्या एका युवकाला विजेचा धक्का लागून तो नदीत पडल्याची घटना रायबाग तालुक्यातील खेमलापूर येथे घडली. या दुर्घटनेनंतर संबंधित युवक बेपत्ता झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून मोहीम राबविण्यात येत आहे.
बसवराज ऐनापूर हा युवक नेहमीप्रमाणे शेताला पाणी देण्यासाठी कृष्णा नदीच्या काठावर गेला होता. यावेळी मोटर पंप दुरुस्त करण्याचे काम करत असताना अचानक विजेचा धक्का बसल्याने तो नदीत पडल्याचे सांगण्यात येत आहे. कुडची पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे.







