• बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या बेंगलोर येथील बक्षिस समारंभात गौरव

बेळगाव / प्रतिनिधी

बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली मध्यवर्ती संघटना व मराठी प्रतिष्ठान बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगलोर येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात राष्ट्रीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या समारंभात बेळगाव केन्द्राला द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाने गौरविण्यात आले.

बेंगलोर येथे रविवारी झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजीव केसकर व श्री. जयदीप भालेराव (बेंगलोर), अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर, महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा संवर्धन मंत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गिरीष पतके, सह-कोषाध्यक्ष श्री. नितीन कपिलेश्वरकर, विभागीय कार्यवाह श्री. परशराम माळी व संयोजक श्री. बापूसाहेब शिंदे उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे तसेच महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा संवर्धन मंत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गिरीष पतके यांनी याप्रसंगी बोलताना मराठी भाषा व जन यांचा आता जगभरातील विविध देशांत वावर आहे . तेथे मराठी संस्कृती प्रकर्षाने पाळली जाते, असे सांगितले.
राज्य मराठी विकास संस्था मुंबई व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांचा मराठी संस्थांना व सभासदांना कसा फायदा होतो याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मराठी भाषा निबंध स्पर्धा व मराठी व्याकरण स्पर्धेच्या 2025-26 या वर्षातील विजेते विद्यार्थी, विषय मार्गदर्शक शिक्षक व निबंध केन्द्रप्रमुख यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर व विभागीय कार्यवाह (कर्नाटक) परशराम माळी यांच्यासह बेळगावातील सौ. किर्ती टेंबे (मंथन), श्रीमती प्रिया कवठेकर (शारदोत्सव), सौ. स्वरुपा इनामदार (वसंत व्याख्यानमाला), सुहास सांगलीकर (सरस्वती वाचनालय), कुमार पाटील (मराठी भाषाप्रेमी मंडळ), रवि शंकर मालशेट (बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघ), विलास पेडणेकर (युवा समिती), सी. आर. पाटील (लोकमान्य ग्रंथालय) आदी संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.