- शॉर्टसर्किटमुळे आगीचे गोळे व ठिणग्या
- स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
बेळगाव : टेंगिनकेरी गल्लीत रस्त्यावरील विजेच्या खांबावर बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बॉक्सला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. खांबातून आगीचे गोळे आणि ठिणग्या पडू लागल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये घबराट पसरली. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.
आगीची तीव्रता लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. धाडसी नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्राथमिक प्रयत्न केला. दरम्यान, संबंधित वीज कंपनीला घटनेची माहिती देण्यात आली.
वीज कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वीजपुरवठा खंडित केला आणि बॉक्सची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच मोठे नुकसान टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.







