• पांगुळ गल्ली, शहापूर सर्कल परिसरात महिला व तरुणींची खरेदीसाठी गर्दी
  • आकर्षक डिझाईन, लाईटिंग आणि कार्टून राख्यांना पसंती

बेळगाव : रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने बेळगावच्या बाजारपेठांमध्ये सणासुदीची लगबग वाढली आहे. भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधण्यासाठी बहिणींकडून राख्यांची खरेदी सुरू झाली असून, शहरातील विविध दुकानांमध्ये रंगीबेरंगी आणि आकर्षक राख्यांनी सजावट करण्यात आली आहे.

पांगुळ गल्ली, शाहापूर सर्कलसह प्रमुख बाजारपेठांमध्ये राख्या खरेदी करण्यासाठी महिला व तरुणींची वर्दळ वाढताना दिसत आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार यंदा बाजारात पारंपरिक राख्यांसोबतच अनेक नवनवीन प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

लहान मुलांसाठी खास कार्टून पात्रांच्या राख्या आणि लाईटिंग राख्या बाजारात आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. याशिवाय रुद्राक्ष, झिरकॉन, मोती तसेच विविध रंगांच्या खड्यांनी सजविलेल्या राख्यांनाही चांगली मागणी आहे. साध्या आणि पारंपरिक राख्यांपासून आकर्षक डिझाईनच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता दुकानदारांनी उपलब्ध करून दिली आहे.

राख्यांची किंमत दहा रुपयांपासून सुरू होत असून, डिझाईन, दर्जा आणि ब्रँडनुसार ती पाचशे रुपयांपर्यंत पोहोचत आहे. महागाईचा परिणाम असला तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावंडांमधील प्रेम व्यक्त करण्यासाठी ग्राहकांकडून मनपसंत राख्या खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे सण जवळ येत असताना बेळगावच्या बाजारपेठांमध्ये राख्यांची रंगत अधिकच वाढली आहे.