बेळगाव : मुसळधार पावसाची तमा न बाळगता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी बेळगावात आंदोलन केले. अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनच्या (AITUC संलग्न) वतीने आयोजित आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या २८ प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मानधनात वाढ करावी, २०११ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी द्यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी आणि अंगणवाडी सेविकांवर सक्तीने सोपविण्यात येणारी बीएलओची जबाबदारी थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
अंगणवाडीच्या नियमित कामांसोबत बीएलओ, एसआयआर, गृहलक्ष्मी तसेच विविध सर्वेक्षणांची अतिरिक्त कामे दिली जात असल्याने अंगणवाडी केंद्रातील मूलभूत कामकाजावर परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.
अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये, तर मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यासोबतच किमान वेतन लागू करणे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, मासिक पाळीची रजा मंजूर करणे, निवृत्तीचे वय ६५ वर्षे करणे, निवृत्तीनंतर पेन्शन देणे आणि अंगणवाडी केंद्रांमध्येच एलकेजी-यूकेजीचे वर्ग सुरू करणे, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.
मुसळधार पावसातही आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवत सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा AITUC संलग्न अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनचे नेते अॅड. नागेश सातेरी यांनी दिला.








