• २६ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत निर्बंध
  • अवजड वाहनांनाही प्रवेशबंदी

बेळगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट रोजी बेळगाव शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.

मिरवणुकीला पिंपळ कट्टा येथून सुरुवात होऊन फोर्ट रोड, मुजावर गल्ली, सेंट्रल बसस्थानक, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, डीसी ऑफिस गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, एन.डी. मेट सिग्नल, धर्मवीर संभाजी सर्कल, फिश मार्केट आणि गव्हर्नमेंट सर्कल मार्गे असद खान दर्गा येथे सांगता होणार आहे.

खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अशोक पिलर, केएलई, हिंडाल्को, लेक हॉस्पिटल, कनकदास सर्कल, कॅन्सर हॉस्पिटल अंडरब्रिज, बॉक्साईड रोड, हनुमान नगर डबल रोड, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल आणि शौर्य चौक या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोगटे सर्कलमार्गे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांनी मिलिटरी महादेव मंदिराजवळून वळसा घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा. तर काँग्रेस रोडमार्गे खानापूरहून शहरात येणाऱ्या वाहनांनी मिलिटरी महादेव मंदिराजवळून डावीकडे वळून एमएलआयआरसी कॅन्टीन, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, मिलिटरी सर्कल, गांधी सर्कल, हिंडलगा गणेश मंदिर, हनुमान नगर डबल रोड आणि बॉक्साईड रोडमार्गे पुढे जाण्याच्या सूचना आहेत.

रेल्वे स्टेशन आणि शनी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. गोगटे सर्कलहून रेल्वे स्टेशन, स्टेशन रोड आणि हेड पोस्ट ऑफिस सर्कलमार्गे शनी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनी गोवावेस सर्कल, महात्मा फुले रोड, बँक ऑफ इंडिया सर्कल, भातकांडे स्कूल क्रॉस आणि ओल्ड पीबी रोडचा वापर करावा.

जिजामाता सर्कलकडून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक, पिंपळ कट्टा आणि पाटील गल्ली क्रॉसकडे जाणाऱ्या वाहनांना भातकांडे स्कूल क्रॉस, बँक ऑफ इंडिया सर्कल, महात्मा फुले रोड आणि गोवावेस सर्कलमार्गे पुढे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शहरात सर्व दिशांनी येणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी राहणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंग करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

पिंपळ कट्टा, फोर्ट रोड, मुजावर गल्ली, सेंट्रल बसस्थानक, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, डीसी गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, एन.डी. मेट सिग्नल, धर्मवीर संभाजी सर्कल, फिश मार्केट आणि गव्हर्नमेंट सर्कल ते असद खान दर्गा या मार्गावर पार्किंग करता येणार नाही. जिजामाता सर्कलजवळील भरतेश एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसमोरील कँटोन्मेंट पार्किंग लॉटवरही निर्बंध राहतील.

वाहनतळासाठी सरदार मैदान, महिला पोलीस ठाण्यामागील मोकळी जागा आणि टिळकवाडीतील जट्ट कॉलनीजवळील मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी पोलीस विभागाच्या सूचनांचे पालन करून निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा आणि पार्किंगच्या जागांचा वापर करावा, असे आवाहन शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे.