• वितरण व्यवस्था ठप्प

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशन) सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने रेशन दुकानदार आणि लाभार्थी त्रस्त झाले आहेत. एका लाभार्थ्याचा अंगठा घेऊन रेशन वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ ते २० मिनिटांपासून तब्बल एक तासापर्यंत वेळ लागत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे.

राज्यभर रेशनची उचल उशिराने झाल्याने महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही अनेक रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचलेले नाही. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली सर्व्हरची समस्या पुन्हा गंभीर झाल्याने नागरिकांना रेशन मिळवण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

या समस्येकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी सरकारी रेशन दुकानदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा विभागाच्या वतीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाचे बेळगावचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक यांना निवेदन देण्यात आले. सर्व्हरची तांत्रिक अडचण दूर करून रेशन वितरण सुरळीत करण्याची मागणी संघटनेने केली.

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांत एवढी गंभीर सर्व्हर समस्या कधीच निर्माण झाली नव्हती. काही ठिकाणी एका लाभार्थ्याचे रेशन कार्डावरील व्यवहार पूर्ण करण्यासाठी तब्बल एक तास लागत असल्याने दिवसभरात मोजक्याच लाभार्थ्यांना धान्य वितरित करणे शक्य होत आहे.

दुकानदार सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्रीपर्यंत दुकाने सुरू ठेवत असले तरी सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे व्यवहार पूर्ण होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांमध्ये दुकानदारांविषयी गैरसमज निर्माण होत असून, प्रत्यक्षात सर्व्हरच्या समस्येमुळेच रेशन वितरणात अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-केवायसीची प्रक्रिया आणि सर्व्हरवरील वाढता ताण यामुळे ही समस्या आणखी गंभीर झाल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे. पुढील दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सोडवून रेशन वितरण सुरळीत न केल्यास बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तभाव दुकान मालकांच्या वतीने अहोरात्र धरणे सत्याग्रह सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

यावेळी बेळगाव जिल्हा व तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार उपस्थित होते.