• समस्त मराठा समाज बेळगावची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्य दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासह पीडित कुटुंबातील अनाथ मुलांना शासकीय मदत आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडे केली. यासंदर्भात शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे रहिवासी असलेले मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) आणि त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) हे उदरनिर्वाहासाठी सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे स्थायिक झाले होते. १५ ऑगस्ट २०२६ रोजी कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने त्यांच्यावर चाकू आणि हातोड्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत मनीषा आणि मोहन केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या दोन लहान मुलांवर पालकांचे छत्र हरपल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने संवेदनशील प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी रमाकांत दादा कोंडुसकर, प्राचार्य आनंद आपटेकर, गुणवंत पाटील, सागर पाटील, मुकेश बारदेश, नंदू इंदलकर, गणेश कदम, कपिल भोसले, विनोद बिर्जे, निलेश मुदगेकर आणि विराज मोरकुंबे उपस्थित होते.

शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी केली. तसेच खटला जलदगती न्यायालयात चालवून कायद्यानुसार आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवून लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करावे, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय पालक गमावलेल्या दोन्ही मुलांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या शिक्षण व भवितव्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली.

मुख्य फिर्यादी, तिचा भाऊ आणि इतर प्रमुख साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.

उपमुख्यमंत्र्यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे तसेच प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. केसरेकर कुटुंबीयांच्या पाठीशी समाज ठामपणे उभा असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.