- ५५ किलोचा मुखवटा, २५ किलोची घंटेसह पूजेचे साहित्य लंपास
- ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सावगाव येथील श्री कलमेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मंदिरातील मौल्यवान साहित्य चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोनच्या सुमारास चोरट्याने मंदिरात प्रवेश केल्याचा संशय आहे. मंदिरातील सुमारे ५५ किलो वजनाचा मुखवटा, २५ किलोची घंटा, समई, अॅम्प्लिफायर तसेच महाप्रसादासाठी वापरण्यात येणारी भांडी असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.
गुरुवारी सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
मंदिरातील चोरीप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे. सावगाव येथील मंदिरात झालेल्या या चोरीचा छडा कधी लागणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








