• बेळगाव उत्तर विभागाच्या आयजीपीपदी रुजू

बेळगाव : वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी उत्तर विभागाच्या आयजीपीपदाची अधिकृत सूत्रे हाती घेतली. बेळगाव येथे मुख्यालय असलेल्या उत्तर विभागाचे नवे आयजीपी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यापूर्वी उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून कार्यरत असलेले चेतन सिंग राठोड यांनी संदीप पाटील यांच्याकडे अधिकृतपणे पदभार सुपूर्द केला. त्यानंतर राठोड यांना पोलीस विभागाकडून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

संदीप पाटील हे बेळगावसाठी नवीन चेहरा नसून, २०१० ते २०१३ या कालावधीत त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, कडक शिस्त आणि जलद निर्णयक्षमतेची छाप उमटली होती. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाकडे पोलीस प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेला ‘जनता दर्शन’ उपक्रम त्या काळात मोठ्या प्रमाणात गाजला होता. सामान्य नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून तत्काळ निराकरण करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

उत्तर विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी संदीप पाटील यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.