• गणपतीचे दर्शन घेऊन परतताना दुर्घटना
  • शॉर्टसर्किटमुळे बस जळून खाक
  • सुमारे १२ लाखांचे नुकसान

निपाणी : संकेश्वर येथील निलगार गणपतीचे दर्शन घेऊन इचलकरंजीकडे परतणाऱ्या एकाच कुटुंबातील १२ भाविकांच्या मिनी बसला तवंदी घाटातील उतारावर रविवारी दुपारी अचानक आग लागली. बसमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. त्यानंतर बसमधील सर्व १२ भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली ; मात्र आगीत मिनी बस पूर्णपणे जळून खाक झाली.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बसला वेढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपनिरीक्षक गंगापा पुजेरी यांनी निपाणी आणि संकेश्वर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. रस्ते देखभाल करणाऱ्या अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे हेही सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाचे निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी मनोहर बिलामारी, सी. एस. पम्मार, सचिन कट्टी आणि रवी हेगडे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत मिनी बस पूर्णपणे जळून मोठे नुकसान झाले होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील १२ भाविकांचे प्राण वाचले.