- प्राथमिक आणि माध्यमिक गटांतील विद्यार्थ्यांचा सहभाग
- विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव
कावळेवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बिजगर्णी हायस्कूलमध्ये निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
निवृत्त क्रीडा शिक्षक के. आर. भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक रमेश कांबळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. संस्थेचे कार्याध्यक्ष पी. आर. गावडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
स्पर्धेच्या प्राथमिक गटात (इयत्ता पाचवी ते सातवी) : बालिका आदर्श, टिळकवाडी येथील भूमी भातकांडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. बेनकनहळ्ळी मराठी शाळेची अनुष्का स. हाजगोळकर द्वितीय, तर येळ्ळूर मराठी मॉडेल स्कूलची स्वरांजली सु. मानकोजी तृतीय आली. बेनकनहळ्ळी प्राथमिक शाळेची रोशनी भोसले आणि कावळेवाडी प्राथमिक शाळेची श्रावणी शशिकांत गावडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
माध्यमिक गटात (इयत्ता आठवी ते दहावी) : बिजगर्णी हायस्कूलची नम्रता ल. सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवला. कर्ले माध्यमिक विद्यालयाची अस्मिता ए. खेमनाळकर द्वितीय, तर बेनकनहळ्ळीच्या शिवराज हायस्कूलची समृद्धी प. पाटील तृतीय आली. बिजगर्णी हायस्कूलची स्नेहा क. हलकर्णीकर आणि कर्ले माध्यमिक विद्यालयाची श्रेया य. मोरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या निबंध लेखनाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळ, छंद आणि ग्रंथवाचनाचीही जोपासना करावी. अपयशाने खचून न जाता जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले. वैचारिक मंथनाला चालना देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला के. आर. भास्कर, वाय. एन. बुरुड, रमेश कांबळे, बी. बी. देसाई, पी. आर. गावडे, आल्फीया नावगेकर, एम. पी. मोरे, लक्ष्मण जाधव, एस. एन. गावडे, नयन जाधव आणि परशराम पाटील आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून सोनाली कांबळे, के. जी. मेणसे आणि पी. आर. गावडे यांनी काम पाहिले. शिक्षिका किरण बा. जाधव यांनी आभार मानले.








