• शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची स्वच्छता
  • अन्नछत्रही राहणार बंद, देवस्थान समितीचे भाविकांना आवाहन

निपाणी : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत बाळूमामा मंदिर शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामासाठी २ ते ५ ऑक्टोबरदरम्यान दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मंदिरासह अन्नछत्रही बंद राहणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि कार्याध्यक्ष रामण्णा मरेगुद्री यांनी दिली.

संत बाळूमामा मंदिरात अमावास्या, रविवार तसेच अन्य दिवशीही विविध राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर नेहमी खुले ठेवण्यात येते. मात्र, शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीचा भाग म्हणून मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात येणार असल्याने चार दिवस दर्शनाची सुविधा बंद राहणार आहे.

याशिवाय, ५ ऑक्टोबर रोजी निवासस्थानही बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन देवस्थान समितीला सहकार्य करावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.