- नऊ तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था
- २० जीव रक्षकांसह क्रेन, मंडप व विद्युत रोषणाईची सुविधा
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी बेळगाव महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. यंदा शहर व उपनगरात ३७० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली असून विसर्जनासाठी शहरातील नऊ तलाव निश्चित करण्यात आले आहेत. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जुन्या कपिलेश्वर तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यंदा बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे उपलब्ध तलावांची क्षमता अपुरी पडण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवापूर्वी तलावांचा आकार वाढविण्याचा प्रस्ताव तत्कालीन पोलीस आयुक्त भूषण बोरेसे यांनी जिल्हा प्रशासन व महापालिकेसमोर ठेवला होता. त्यानुसार तलावांची पाहणीही करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यावर ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यंदा उपलब्ध असलेल्या तलावांमध्येच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागणार आहे.
विसर्जनासाठी जुना कपिलेश्वर तलाव, नवीन कपिलेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव, अनगोळ तलाव, कलमेश्वर तलाव, ब्रह्मदेव मंदिर, नाझर कॅम्प-वडगाव, किल्ला तलाव आणि कणबर्गी तलाव अशी नऊ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
दरवर्षी गणेश मंडळांची संख्या वाढण्याबरोबरच मूर्तींची उंचीही वाढत आहे. त्यामुळे अनेक तलावांची रुंदी व खोली अपुरी पडत असून, मोठ्या मूर्तींचे विसर्जन करताना क्रेनच्या मदतीने बराच वेळ लागत आहे. भविष्यात ही समस्या टाळण्यासाठी तलावांचा आकार वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. मात्र, यंदा महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या नऊ तलावांमध्येच विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जनासाठी नवीन कपिलेश्वर तलावावर चार, जुन्या कपिलेश्वर तलावावर तीन, रामतीर्थ तलावावर तीन आणि अनगोळ तलावावर दोन क्रेन ठेवण्यात येणार आहेत. तसेच कलमेश्वर तलाव-वडगाव, ब्रह्मदेव मंदिर, किल्ला तलाव आणि कणबर्गी तलाव येथे प्रत्येकी एक क्रेन उपलब्ध राहणार आहे.
विसर्जनस्थळी २० जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मंडप, विद्युत रोषणाई आणि स्पीकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. दीड दिवस, पाच दिवस आणि सातव्या दिवशी होणाऱ्या घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठीही महापालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.







