- १८ हजार १०२ सुपाऱ्यांपासून साकारली ८ फूट उंच गणेशमूर्ती
बेळगाव : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ओळखल्या जाणाऱ्या बेळगावच्या नानावाडी गणेशोत्सव मंडळाने यंदाही अभिनव उपक्रम राबवत सलग चौदाव्या वर्षी ईको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारली आहे. यंदा मंडळाने तब्बल १८ हजार १०२ सुपाऱ्यांपासून ८ फूट उंच गणेशमूर्ती तयार केली आहे.
शाडू माती आणि गवतापासून मूर्तीचा सांगाडा तयार करून त्यावर सुपाऱ्या चिकटवण्यात आल्या आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः हे काम केले आहे. मूर्तिकार मारुती कुमार यांनी ही सुबक मूर्ती घडवली आहे.
विशेष म्हणजे बेळगाव शहरात फटाके आणि डीजे न वाजवता गणेशोत्सव साजरा करणारे आदर्श मंडळ म्हणून नानावाडी मंडळाची ओळख आहे. पर्यावरणपूरक उत्सवाची ही परंपरा मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे.
गेल्या १४ वर्षांत मंडळाने फुले, वाळू, सुका मेवा, धान्य, तळलेले मोदक, रुद्राक्ष, तुळशीमाळा अशा विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती साकारल्या आहेत. यंदाची १८,१०२ सुपाऱ्यांपासून साकारलेली गणेशमूर्तीही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.








