• पालकमंत्री सतीश जारकीहोळींचे आश्वासन
  • उपचाराचा खर्च, झालेली हानी आणि पुनर्वसनाबाबत सरकारकडून निर्णय
  • असुरक्षित घरांना घरकुल योजनांत प्राधान्य देण्याचा विचार

बेळगाव : चव्हाट गल्ली परिसरातील ढोर गल्ली येथे झालेल्या भीषण अग्निकांडातील पीडित कुटुंबीयांना शासनाकडून शक्य ती तातडीची मदत मिळवून देण्यात येईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आश्वासन दिले. दुर्घटनेनंतर घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. उपचाराचा खर्च, झालेली हानी आणि कुटुंबीयांना भविष्यात आवश्यक असलेली मदत याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केल्यानंतर मध्यरात्री सुमारे २.३० वाजता घराला आग लागली. या दुर्घटनेत शारदा दमोने, प्रिया दमोने, गंगा दमोने आणि भारती दमोने या चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला. गजानंद दमोने आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजानंद दमोने हे सुमारे ८० टक्के, तर त्यांच्या मुलाला सुमारे ४० टक्के भाजल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली.

घटनेनंतर पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उत्तरचे आमदार असिफ सेठ, महापौर प्रीती खामकर, मनपा आयुक्त एम. कार्तिक, उपमहापौर तसेच भाजप नेते किरण जाधव यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माजी आमदार अनिल बेनके यांनीही दमोने कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

  • आगीचे कारण तपासानंतर स्पष्ट होणार

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी फॉरेन्सिक विशेष तज्ज्ञांचे पथक दाखल झाले असून, एचईएसकॉम अधिकाऱ्यांकडूनही तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक पाहणीत शॉर्टसर्किटचा संशय असला, तरी फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. फ्रिजमधून स्फोटासारखा आवाज आल्याचे जखमी मुलाने सांगितल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

दुर्घटनेतील चारही मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. तपास अहवालात कोणाची चूक किंवा जबाबदारी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

  • असुरक्षित घरांच्या पुनर्वसनाचा विचार

ढोर गल्लीसारख्या परिसरातील असुरक्षित घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचा प्रश्नही यावेळी उपस्थित झाला. अशा कुटुंबांना सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्यासाठी घरकुल योजनांमध्ये प्राधान्य देण्याबाबत सरकारकडे सूचना केली जाईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले. शहरी भागातील कुटुंबांना घरकुल योजनांचा लाभ मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी स्वतंत्र प्राधान्य किंवा आरक्षणाच्या माध्यमातून मदत करण्याबाबत महापौर, उपमहापौर, आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चार महिलांच्या मृत्यूने ढोर गल्ली परिसरावर शोककळा पसरली असून, गंभीर जखमी दोघांच्या उपचारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.