- १६ सप्टेंबरच्या सुनावणी यादीत सीमाप्रश्नाचा दावा समाविष्ट
- सीमाभागातील नागरिकांचे लक्ष
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित दाव्यावर उद्या, १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. १६ सप्टेंबरच्या सुनावणी यादीत हा दावा समाविष्ट करण्यात आल्याने सीमाभागातील नागरिकांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयातील घडामोडींकडे लागले आहे.
सीमाप्रश्नावरील सुनावणी लवकर व्हावी यासाठी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी सरन्यायाधीशांच्या न्यायालयात दावा मेंशन केला होता. त्यानंतर हा दावा ९ सप्टेंबरच्या बोर्डावर आला होता. मात्र, त्या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. आता पुन्हा १६ सप्टेंबरच्या सुनावणी यादीत प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने ८ जुलै रोजी उच्चाधिकार समितीत झालेल्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या प्रकरणासाठी ज्येष्ठ वकील गोपाळ सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे.
सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी गोपाळ सुब्रमण्यम यांनी या प्रकरणासंदर्भात सविस्तर ब्रीफिंग घेतले. यावेळी ज्येष्ठ वकील अपराजिता, शिवाजीराव जाधव, दिनेश ओऊळकर, राहुल प्रताप आणि संतोष काकडे उपस्थित होते. बेळगावहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वकील महेश बिरजे तसेच मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे सहभागी झाले होते.
त्यामुळे उद्याच्या सुनावणीत सीमाप्रश्नाच्या प्रकरणावर काय घडामोड होते, याकडे सीमाभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.








