• ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि फटाक्यांची आतषबाजी
  • बेळगाव शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला प्रारंभ

बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने, पारंपरिक वाद्यांच्या गजराने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने बेळगाव तालुक्यासह शहर परिसर सोमवारी भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. सकाळपासून घरोघरी गणरायाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले, तर सायंकाळनंतर सार्वजनिक गणेशमूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची लगबग सुरू होती. समादेवी गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, टिळकवाडी, शहापूर-वडगाव यासह शहरातील विविध भागांत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गणेशमूर्तींसोबत पूजेसाठी लागणारी पाच फळे, पूजा साहित्य, फुले, हार आणि इतर वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुले, हार आणि फळांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.

घरगुती गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात स्वागत करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर बाप्पाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत कुटुंबीयांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

  • सार्वजनिक मंडळांतही उत्साह :

बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर गणेशमूर्तींचे आगमन सोहळे आयोजित करण्याची परंपरा वाढत आहे. त्यानुसार काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश चतुर्थीच्या दोन-तीन दिवस आधीच आपल्या मूर्ती नियोजित मंडपस्थळी नेल्या होत्या. उर्वरित मंडळांची सायंकाळी तीननंतर मूर्ती मंडपस्थळी नेण्यासाठी लगबग सुरू झाली.

मूर्ती मंडपस्थळी नेल्यानंतर विधिवत प्रतिष्ठापना आणि आरती करण्यात आली. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शहर, ग्रामीण भाग तसेच संबंधित पोलिस ठाण्यांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा उत्साह कायम होता.

गणरायाच्या आगमनाने बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, पुढील दिवसांत गणेशोत्सवाचा हा उत्साह आणखी वाढणार आहे.