- कृष्णा -पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
शिरोळ : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता धार्मिक वातावरणात संपन्न झाला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सोमवारी मंदिराच्या चारही बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. त्यानंतर पहाटे दक्षिणद्वार सोहळा सुरू होताच भाविकांनी दर्शन आणि पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी केली.
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ तसेच ‘श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषात भाविकांनी दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. या सोहळ्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे मिळाल्यानंतर सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज आदी भागांतून मोठ्या संख्येने भाविक नृसिंहवाडीत दाखल झाले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान समितीने अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी महाराजांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, नृसिंहवाडी–औरवाड जोडणारा जुना पूल पुराच्या पाण्याखाली गेला असून शिरोळ, राजापूर आणि तेरवाड येथील बंधारे यापूर्वीच पाण्याखाली गेले आहेत.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर दिशेने वाहणारा कृष्णा नदीचा प्रवाह श्री दत्तांच्या चरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतो. या धार्मिक घटनेला ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे म्हटले जाते. श्रीचरणांवरून वाहणाऱ्या पवित्र कृष्णा प्रवाहात स्नान केल्यास पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नदीची पाणीपातळी पूर्णपणे नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असल्याने हा सोहळा नेमका कधी सुरू होईल किंवा कधी समाप्त होईल, हे निश्चित सांगता येत नाही. पाणी वाढताना आणि ओसरताना अशा दोन वेळा हा सोहळा अनुभवायला मिळतो.
पुराच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील पहाटेच्या काकड आरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंतचे सर्व नित्य धार्मिक कार्यक्रम परमपूज्य श्री नारायण स्वामी महाराजांच्या मंदिरात होत आहेत. दररोज सायंकाळी धूपारतीनंतर कृष्णा नदीची पूजा आणि इंदुकोटी स्तोत्राचे पठणही केले जात आहे. तसेच नदीचे पाणी अधिक वाढेपर्यंत देवस्थानच्या अन्नछत्रामधील महाप्रसादाची सेवाही नियमित सुरू राहणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे.








