• मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थ संतप्त
  • सांडपाणी रस्त्यावर, चिखल-दुर्गंधीने नागरिक हैराण
  • प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

बाळेकुंद्री : बेळगाव शहरापासून अवघ्या १० किलोमीटरवर आणि सांबरा विमानतळालगत असलेल्या बाळेकुंद्री खुर्द गावात गेल्या दहा वर्षांपासून विकासकामे रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, सांडपाण्याची समस्या आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे जनजीवन त्रस्त झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

फुलबाग गल्ली, कसाई गल्ली, टिपू सुलतान गल्ली, मुल्ला गल्लीसह गावातील अनेक भागांमध्ये सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नसल्याने घरातील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल साचून दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाला आहे.

विशेषतः मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दूषित पाणी वाहत असल्याने नमाजासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दूषित पाणी अंगावर उडत असल्याने धार्मिक कार्यातही अडथळे निर्माण होत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

गेल्या दशकभरात या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने रस्ते आणि सांडपाणी निचऱ्याची समस्या सोडवावी, अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.