• मिरज – बेळगाव – हुबळी मार्गे प्रवाशांना नवी सुविधा

बेळगाव : नैऋत्य रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा करत पंढरपूर ते यशवंतपूर (बेंगळुरू) दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू केली आहे. ही रेल्वे दर शुक्रवारी पंढरपूरहून सुटणार असून मिरज, रायबाग, घटप्रभा, बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, हरिहर, दावणगेरे, बिरूर जंक्शन, अरसीकेरे आणि तुमकूर मार्गे यशवंतपूरला जाणार आहे.

सुमारे ८८० किलोमीटरचा हा प्रवास अंदाजे १५ तास ५० मिनिटांत पूर्ण होणार असून पंढरपूरहून दुपारी १.३५ वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता यशवंतपूर येथे पोहोचेल. मिरज स्थानकावर इंजिनची दिशा बदलण्यात येणार आहे. या एक्सप्रेसला एकूण २१ डबे जोडण्यात आले असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे, स्लीपर, जनरल डबे, पँट्री कार आणि गार्ड डब्यांचा समावेश आहे.

या गाडीचे अंदाजे तिकीट दर प्रथम श्रेणी एसीसाठी ₹२,९२५, द्वितीय श्रेणी एसीसाठी ₹१,७५०, तृतीय श्रेणी एसीसाठी ₹१,२३५, स्लीपरसाठी ₹४७० आणि जनरलसाठी ₹२३० इतके आहेत. या नव्या रेल्वे सेवेमुळे बेळगाव, मिरज, हुबळी तसेच उत्तर कर्नाटकातील प्रवाशांना पंढरपूर आणि बेंगळुरू दरम्यान अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.