- नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
- प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
गोकाक : राज्यात मान्सूनने जोर धरताच बेळगावचा ‘नायगारा’ म्हणून ओळखला जाणारा गोकाक धबधबा पुन्हा एकदा खळाळत कोसळू लागला आहे. सततच्या पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला असून, निसर्गाचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून धबधब्याच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून, धबधबा पूर्ण जोमात वाहत आहे. खळाळत कोसळणाऱ्या पाण्याचा गडगडाट आणि परिसरातील हिरवळ यामुळे पर्यटकांना निसर्गसौंदर्याची अनोखी मेजवानी मिळत आहे. राज्याच्या विविध भागांतून पर्यटक गोकाक धबधब्याकडे आकर्षित होत आहेत.

दरम्यान, पाण्याची पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सेल्फीच्या मोहापायी जीव धोक्यात घालू नये तसेच मुलांसह येणाऱ्या पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस व पर्यटन विभागाने घालून दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचेही प्रशासनाने आवाहन केले आहे.








