• कृष्णा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
  • चिक्कोडी तालुक्यावर पुराचे सावट
  • प्रमुख पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता

चिक्कोडी : महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या खोऱ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. कल्लोळजवळ सध्या कृष्णा नदीत सुमारे ५३ हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू असून, नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या एका दिवसात कृष्णा नदीची पाणीपातळी ४ ते ५ फुटांनी वाढली आहे. नदीतील पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने पुराचा धोका अधिक गडद होत आहे.

कृष्णा नदीबरोबरच चिक्कोडी तालुक्यातील दूधगंगा आणि वेदगंगा या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली असून, या नद्या धोक्याच्या पातळीच्या दिशेने प्रवाहित होत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पाण्याची पातळी अशीच वाढत राहिल्यास येडूर–कल्लोळ आणि मलिकवाड – दत्तवाड या प्रमुख जोडपुलांसह नदीपात्रावरील अनेक संपर्कमार्ग संध्याकाळपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी विनाकारण नदीकाठच्या भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.