• जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक

बेळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रगती आढावा बैठक पार पडली. यावेळी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीनंतर बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी, पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत जनतेने चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. पुढील पाच ते सात दिवस समाधानकारक पाऊस झाल्यास पुढील चार ते पाच महिन्यांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, सध्या राकसकोप जलाशयात ०.०४ टीएमसी पाणीसाठा असून पाणीपातळी हळूहळू वाढत आहे. आणखी तीन दिवस पाऊस सुरू राहिल्यास जलाशयाची पातळी १ ते १.५ फूट वाढण्याची शक्यता आहे. शहरातील सर्व प्रभागांना नियोजनानुसार पाणीपुरवठा केला जात असून, एकूण ३३ झोनपैकी ६ झोन पूर्णपणे कार्यरत आहेत, तर २७ झोनमध्ये आळीपाळीने दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी मार्कंडेय नदीवरील जलाशयात ०.००७८ टीएमसी पाणीसाठा झाल्याची माहिती दिली. पाऊस न पडला तरी २५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी पाणीपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना वेळेत माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यापूर्वी केवळ तीन दिवसांच्या बंदमुळे नागरिकांना तब्बल १५ दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याचा उल्लेख करत त्यांनी भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा टाळण्याचे निर्देश दिले.

बैठकीत जिल्ह्यातील पीक आणि मालमत्तेच्या नुकसानीचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापालिका आयुक्त कार्तिक एम. तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.