• ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासूनचा कामाचा ताण आणि सततची धावपळ याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात आयोजित करण्यात आलेला शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला.

सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कारण नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले आहे.