• प्रवाशांमध्ये नाराजी ; प्रवास नियोजनावर परिणाम

बेळगाव : बेळगाव – दिल्ली दरम्यानची दैनंदिन विमान सेवा १ जुलैपासून बंद करण्यात आली असून, आता ही सेवा आठवड्यातून केवळ सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी उपलब्ध राहणार आहे. ऑक्टोबरपर्यंत लागू राहणाऱ्या या नव्या वेळापत्रकामुळे व्यावसायिक, विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि नियमित प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

इंधनाचे वाढते दर आणि इतर आर्थिक कारणांमुळे विमान कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नव्या वेळापत्रकानुसार विमानाच्या येण्या-जाण्याच्या वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसला, तरी फेऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर परिणाम होणार आहे.

बेळगाव- दिल्ली मार्गावर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक, सरकारी अधिकारी, विद्यार्थी आणि पर्यटक प्रवास करतात. दैनंदिन सेवा बंद झाल्याने अनेकांना जोड-विमान सेवा (कनेक्टिंग फ्लाईट्स) किंवा इतर पर्यायांचा अवलंब करावा लागणार असून, तिकीटांचे दर वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी १५ जूनपासून बेळगाव- बेंगळुरू मार्गावरील दोन दैनंदिन विमानांपैकी एक सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्ली मार्गावरील फेऱ्यांमध्ये कपात झाल्याने नियमित विमान प्रवाशांची गैरसोय आणखी वाढली आहे.

सध्या बेळगावहून मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्लीसाठी थेट विमान सेवा उपलब्ध आहे. मात्र, यापूर्वी बंद करण्यात आलेले इतर अनेक मार्ग अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. विमान सेवांचे जाळे हळूहळू कमी होत असल्याने भविष्यात आणखी काही मार्गांवरील फेऱ्यांमध्ये कपात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

यामुळे संबंधित विमान कंपन्या आणि प्रशासनाने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून बेळगाव- दिल्लीसह अन्य मार्गांवरील नियमित विमान सेवा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.