- सरकारी नोंदीतील डिजिटल डेटाबेसच्या आधारे १० वर्षांतील १२ बेपत्ता व्यक्तींचा शोध
- जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची माहिती
बेळगाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे बेळगाव जिल्ह्यात विविध कारणांमुळे घर सोडून गेलेल्या आणि अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या १२ व्यक्तींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कौटुंबिक कलह, वैयक्तिक वाद तसेच इतर कारणांमुळे घर सोडून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पारंपरिक तपास पद्धतींसोबतच आता एआय तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर केला जात आहे.
बेपत्ता व्यक्तींचे छायाचित्र डिजिटल डेटाबेसमध्ये अपलोड केले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्ती देशातील कोणत्याही भागात शासकीय लाभ, ओळखपत्र किंवा इतर ऑनलाइन सेवांसाठी अर्ज करताच एआय प्रणालीद्वारे त्याची माहिती उपलब्ध नोंदींशी पडताळली जाते. त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळून संबंधित व्यक्तीचा माग काढणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या तंत्रज्ञानाच्या मदतीने बेळगावमधून बेपत्ता झालेल्या काही व्यक्ती गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळून आल्या आहेत. अशा व्यक्तींचा ठावठिकाणा समजताच पोलीस तातडीने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा एकत्र आणण्याची प्रक्रिया राबवत असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक रामराजन यांनी दिली.








