- समाजसेवक गणेश दड्डीकर यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
बेळगाव : डेक्कन हॉस्पिटलसमोरील बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील न्यू गुड्स शेड रस्त्याची तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना जलनिस्सारण गटारी उभाराव्यात, अशी मागणी समाजसेवक गणेश दड्डीकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यापूर्वी १० जून २०२६ रोजीही याच मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून रस्ता लवकरच दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
निवेदनानुसार, एल अँड टी कंपनीने केलेल्या कामानंतर हा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि दैनंदिन प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक किरकोळ अपघात झाले असून महिलांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे पाठदुखी आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेले चिखलमिश्रित पाणी विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशावर उडत असून आरोग्याचा धोका वाढत आहे. तर उन्हाळ्यात धुळीचे प्रदूषण वाढून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी थेट न्यू गुड्स शेड रस्त्यावर येत असल्याने दरवर्षी रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी दुरुस्तीबरोबरच दोन्ही बाजूंना सक्षम जलनिस्सारण गटारी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कायमस्वरूपी काम सुरू होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजने म्हणून रस्त्यावर स्टोन डस्ट किंवा वेट मिक्स टाकून रोड रोलरद्वारे समतल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यातही कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे आणि रस्त्याच्या दुरुस्ती व जलनिस्सारणाच्या कामांचा कालबद्ध कार्यक्रम लेखी स्वरूपात जाहीर करावा, अशी मागणी गणेश दड्डीकर यांनी केली आहे.








